मूळचा बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे याने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले नाव इतिहासात कोरले. अविनाश भारतीय सैन्यदलातील एक समर्पित सैनिक असून त्याने ३००० मीटरमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने स्टीपलचेस इव्हेंट मध्ये ८ मिनिटे आणि १९.५० सेकंदांच्या उल्लेखनीय वेळेसह नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या अभिमानास्पद कामगिरीमुळे तो ३००० मीटर स्टीपलचेस ऍथलीट प्रकारात आशियातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून उदयास आला आहे. त्याने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या होसेन केहानीच्या ८ मिनिटे आणि २२. ७९ सेकंदांच्या विक्रमाला सुद्धा मागे टाकले आहे.
३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच, अविनाश साबळेने पहिल्या ५० मीटरमध्ये वेग वाढवत पुढे चाल दिली आणि त्याने संपूर्ण शर्यतीत ही गती कायम ठेवली. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे १२ वे सुवर्णपदक ठरले आणि स्टीपलचेस शर्यतीत देशासाठी ऐतिहासिक पहिले सुवर्णपदक नोंदवले गेले.